
कणकवली : तालुक्यातील हुंबरठ येथे वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या याप्रकरणी दोन्ही गटांतील व्यक्तींनी कणकवली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी नोंदविल्या आहेत. त्यानुसार ७ जणांविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठोबा तुकाराम मर्ये यांच्या फिर्यादीनुसार, शेत जमिनीत चिखल करत असताना मंगेश मर्ये व त्यांची पत्नी ममता मर्ये यांनी लावणीसाठी चिखल करण्यास मला विरोध करत शिवीगाळ केली. मला व माझा पुतण्या कैलास मर्ये याला लोखंडी कोयत्याच्या उलट्या बाजूने व लाकडी दाडयाने मारहाण करीत दुखापत केली. याप्रकरणी मंगेश तुकाराम मर्ये व ममता मंगेश मर्ये (दोघे रा. हुंबरट-पिंपळवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश तुकाराम मर्ये यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. वडिलोपार्जित जमिनाचे वाद असताना दिलीप तुकाराम मर्ये, कैलास तुकाराम मर्ये, विठोबा तुकाराम मर्ये, वर्षा विठोबा मर्ये, दिलीप मनोहर हुले (सर्व रा. हुंबरट-पिंपळवाडी) ही मंडळीत शेत जमिनीत काम करीत होते. याबाबत मी त्यांना विचारणा केली. या रागातून त्यांनी मला व पत्नी ममता हिला शिवीगाळ करीत मारहाण करून दुखापत केली. कैलास मर्ये याने हुंबरट-पिंपळवाडी येथे उभी असलेल्या कारवर दगड टाकून नुकसान केले. याप्रकरणी दिलीप मर्ये, कैलास मर्ये, विठोबा मर्ये, वर्षा मर्ये, दाजी हुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शेगडे हे करीत आहेत.