
कुडाळ : वेंगुर्ले तालुक्यातील मठ ते कुडाळ या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गावर विद्युत वितरण कंपनीच्या ठेकेदाराने कोणतीही परवानगी न घेता भूमिगत विद्युत वाहिनीसाठी जेसीबीच्या साहाय्याने या मार्गावरील साईडपट्टीवर खोदाई केली. साईडपट्टी बुजवण्याच्या सूचना देऊनही ती तशीच ठेवल्याने यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुमारे ३० लाखाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांनी कुडाळ पोलिसात दिलेल्या तकारीनुसार, ठेकेदार भीमराव घाटोळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ३१ मे २०२५ ते ३ जुलै २०२५ या कालावधीत घडली आहे. यामध्ये कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता ईश्वर रामचंद्र बामणे यांनी कुडाळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, वेंगुर्ले तालुक्यातील मठ-कुडाळ-गारगोटी हा राज्यमार्ग देखभाल दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक १ कुडाळ यांच्याकडे आहे. दरम्यान, या मार्गावर कुडाळ तालुक्यातील वरवडे येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे ठेकेदार भीमराव घाटोळे यांनी ३१ मे २०२५ ते ३ जुलै २०२५ या कालावधीत या सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणत्याही प्रकारची मंजुरी न घेता रस्त्याच्या साईडपट्टीवर जेसीबीच्या साहाय्याने खुदाई केल्याचे निदर्शनास आले आहे. ठेकेदार भीमराव घाटोळे याना ही साईटपट्टी बुजविण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, अद्यापपर्यंत ही साईडपट्टी बुजविण्यात आली
यामुळे शासनाच्या मालमत्तेचे अंदाजे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी जेसीबीसह अन्य मशिनरी ताब्यात घेण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल ममता जाधव करत आहेत, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.