
चिपळूण : समाजात "डॉक्टर" या शब्दाला श्रद्धेने पाहिले जाते. मात्र, काही विकृत डॉक्टर या सन्मानाला काळिमा फासतात. अशाच एका प्रकरणात डॉ. नोमान इब्राहिम अत्तार (वय ३६) याच्याविरोधात फसवणूक व शारीरिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आले असून, १७ जून २०२५ रोजी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्यस्थितीत आरोपी तळोजा न्यायालयीन कोठडीत असून, १६ जुलै २०२५ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
पीडित महिला प्रियंका (वय ३२) हिने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, २०२३ मध्ये सोशल मीडिया अॅपवरून ओळख वाढवत डॉ. अत्तारने तिला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर १५ व १६ जुलै रोजी महापे एमआयडीसी येथील हॉटेलमध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतरही हे संबंध तळोजा येथील त्याच्या घरी व पीडितेच्या घरी सुरू राहिले.
ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रियंका गर्भवती राहिल्यानंतर, डॉ. अत्तारने तिला लग्नाचे आश्वासन दिले, मात्र औषध देऊन गर्भपातासाठी भाग पाडल्याचा आरोप तिच्याकडून करण्यात आला आहे. या मानसिक त्रासामुळे २६ मे २०२४ रोजी प्रियंकाने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.
डॉ. अत्तारने डिसेंबर २०२४ मध्ये चिपळूण येथे स्वतःची ओपीडी सुरू केली होती. प्रियंका त्याला सोशल मिडिया मार्केटिंगसाठी मदत करत होती. मात्र, त्याचे हेतू केवळ शारीरिक संबंधापुरते होते, असा आरोप तिने केला आहे. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी शेवटचा शारीरिक संबंध झाल्याचे तिने नमूद केले आहे.
४ एप्रिल २०२५ रोजी चिपळूण येथे आयोजित हेल्थ कॅम्पमध्ये डॉ. अत्तार एका मुस्लिम महिलेसोबत दिसून आला आणि त्याने तिच्याशी लग्न केल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती दुबईत असलेल्या प्रियंकाला मिळाल्यानंतर तिने फसवणूक झाल्याची जाणीव होऊन पोलीस तक्रार दाखल केली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ६९ (फसवणूक) आणि कलम ८९ (शारीरिक शोषण) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, सर्व आरोपांची सखोल चौकशी केली जात आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक राहुल सत्यवान गरड यांनी दिली.