लायटरवरून झालेल्या वादानंतर चुलत भावाचा खून

Edited by:
Published on: July 16, 2025 17:43 PM
views 343  views

देवगड: देवगड तालुक्यातील वरेरी कुळये सडेवाडीनजीकच्या एका चिरेखाणीवर सिगारेट पेटवण्यासाठी लायटर न दिल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर एका परप्रांतीय कामगाराने आपल्याच चुलत भावाच्या डोक्यात ट्रकची 'टॉमी' मारून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी (१६ जुलै २०२५) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव कृष्णकुमार जुगराज यादव (वय २०, मूळ रा. मध्यप्रदेश) असे आहे. तर या प्रकरणी संशयित आरोपी रितिक दिनेश यादव (वय २०, मूळ रा. मध्यप्रदेश) याला देवगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरेरी कुळये सडेवाडीनजीकच्या चिरेखाणीवर काम करत असताना सिगारेट पेटवण्यासाठी लायटर न दिल्याने कृष्णकुमार आणि रितिक यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रितिकने रागाच्या भरात कृष्णकुमारच्या डोक्यात ट्रकची 'टॉमी' मारली, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. तसेच, सिंधुदुर्गचे अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि कणकवली विभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांनीही घटनास्थळाला भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली.