
चिपळूण : एका निवृत्त शिक्षिकेच्या खुनामुळे चिपळूणमध्ये खळबळ उडाली आहे. वर्षा वासुदेव जोशी (वय ६९, धामणवणे-खोतवाडी) असे त्यांचे नाव आहे. त्या सहा तारखेपासून पीठापूर यात्रेला जाणार होत्या. तत्पूर्वीचं त्यांचा निघृण खून झाला. आरोपींनी वर्षा जोशी यांना क्रूरपणे संपविले. याशिवाय जोशी यांच्या घरातील सीसीटीव्ही यंत्रणा देखील गायब आहे. त्यामुळे पोलिसांसमोर या खुनामागील तपासाचे मोठे आव्हान आहे. त्यांनी अधिक चौकशीसाठी वर्षा जोशी यांच्या पुतण्याला ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळावरून मिळलेल्या माहितीनुसार, वर्षा जोशी या निवृत्त शिक्षिका होत्या. त्यांचे पती वासुदेव यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर त्या घरी एकट्याच राहायच्या. गेले दोन वर्षे रक्षाबंधन निमित्त त्या पीठापुर यात्रेला जात असत. यावर्षी देखील त्यांनी ६ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट पर्यंतच्या यात्रेचे जाण्यासाठी जिल्ह्यातील एका एजन्सीकडे बुकिंग केले होते. त्यानुसार, ही यात्रा ६ ऑगस्ट पासून रत्नागिरीतून सुरू झाली. त्यावेळी टूर एजन्सीकडून वर्षा जोशी यांना संपर्क करण्यात आला. त्या चिपळूण पासून त्यांच्या ग्रुपमध्ये सहभागी होणार होत्या. परंतु दिवसभर अनेकदा मोबाईलवर कॉल करूनही त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना सोबत न घेताच टूर एजन्सीची गाडी पुढील प्रवासाला गेली.
दरम्यान, आज सकाळीही यात्रेत सहभागी असलेल्या वर्षा जोशींच्या सहकाऱ्यांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा काहींनी त्यांच्या शेजाऱ्यांना ही माहिती दिली. आणि त्या घरात आहेत का हे बघण्यास सांगितले. तेव्हा शेजाऱ्यांनी त्यांचे घर गाठत पाहणी केली तेव्हा घरचा मुख्य दरवाजा बंद होता. त्यांनी वर्षा जोशींना जोरजोरात हाक मारली, परंतु आतून काहीच उत्तर मिळाले नाही. मात्र, घराचा मागील दरवाजा उघडा दिसला. म्हणून शेजाऱ्यांनी आत जाऊन पाहिले आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली.
आतमधील दृश्य भयानक होते. वर्षा जोशी गपगार पडल्या होत्या. त्यांचे हातपाय बांधण्यात आले होते. त्या निर्वस्त्र होत्या. हे दृश्य पाहिल्यावर शेजाऱ्यांनी तात्काळ चिपळूण पोलिसांना संपर्क साधला. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचा अंदाज आहे. मात्र घरातून नेमके काय चोरीस गेले आहे, याची खातरजमा सुरू आहे. काही संशयितांवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत असून, घटनेमागील नेमका उद्देश व हत्येतील संभाव्य गुन्हेगार शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र लवकरच आरोपी गजाआड असतील, असा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे.