निवृत्त शिक्षिकेच्या खूनाचा उलगडा

धक्कादायक कारण आलं समोर
Edited by: मनोज पवार
Published on: August 09, 2025 17:33 PM
views 1326  views

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथे झालेल्या निवृत्त शिक्षिकेच्या खुनाने अवघा महाराष्ट्र हादरला होता. 68 वर्षीय वर्षा जोशी यांच्या हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेत चिपळूण पोलिसांनी युद्ध पातळीवर तपास सुरु केला. पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून चिपळूण तालुक्यातील गोंधळे गावातील जयेश गोंधळेकर या तरुणाने दागिने आणि पैशांसाठी खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

जयेश गोंधळेकर हा काही वर्षांपूर्वी सातारा येथे नोकरी करत होता. तो मूळ जोशी यांच्या गोंधळे गावातीलच गोंधळेकर कुटुंबातील आहे. तो सध्या चिपळूण परिसरात राहत होता. मात्र नोकरी धंदा करत नव्हता. त्यामुळे पैशांसाठीच त्याने हा खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दार तोडून नव्हे, तर आतून उघडल्यानंतर त्यांचा खून झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्यामुळे हा प्रकार कोणीतरी ओळखीतल्या व्यक्तीने केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता.

निवृत्त शिक्षिकेच्या हत्येची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी समोर आली होती. ही घटना घडल्याचं कळताच तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला होता. आरोपी जयेशने खून प्रकरणाचे पुरावे नष्ट करत, कोणालाही याबद्दल कळू नये यासाठी कॉम्प्युटर हार्डडिस्कही गायब केल्या होत्या.

जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक विभागातून वर्षा जोशी निवृत्त झाल्या होत्या. पतीचे अकरा वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर त्या एकट्याच राहत होत्या आहे. निवृत्तीनंतर फिरुन त्या आयुष्याचा आनंद उपभोगण्याचा प्रयत्न वर्षा जोशी करत होत्या. दोन वर्षांपूर्वी त्यांनी नर्मदा परिक्रमाही पूर्ण केली होती. इतकंच नाही तर त्या काही दिवसात हैदराबादला फिरायला जाणार होत्या. त्यांची मैत्रिण त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र संपर्क होत नसल्याने तिने एका तरुणाला विचारपूस करण्यास पाठवलं आणि हत्येचा उलगडा झाला.