
सावंतवाडी : बजरंग दल सावंतवाडीच्या कार्यकर्त्यांनी गोव्यात कत्तलीसाठी जाणाऱ्या गुरांची तस्करी रोखत संबंधितांना बांदा पोलिसांच्या ताब्यात दिले. थरारक पाठलाग करत गोवंश वाहतूक करणारी ही गाडी गो-रक्षकांनी धरून दिली.
गोवा येथील मालवाहू गाडीतून या गुरांची अवैधरित्या वाहतूक होत होती. चोर वाटेने ही गाडी गोव्यात जात असताना बजरंग दल सावंतवाडीच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी अडवत तस्करी रोखली. थरारक पाठलाग करत ही मोहिम राबविण्यात आली. राज्य सरकारने गाईंना गोमातेचा दर्जा दिलेला असताना भर दिवसा गो तस्करीच धाडस केलच कसं जात ? असा सवाल उपस्थित होत असून बांदा पोलिसांच्या भुमिकेबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. गो रक्षकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यामधे स्थानिक व्यापारीही असून त्यांच्यावर ही कारवाई करण्याची मागणी बजरंग दलने केली आहे. दरम्यान, वाहन चालकाकडून ही गाडी गोवंश कत्तलीसाठी जात असल्याचे कबुल केले. यानंतर या तस्करांना गो-रक्षकांनी बांदा पोलिसांच्या ताब्यात दिल. यानंतर पुढील कार्यवाही बांदा पोलिस करत आहेत.