
दोडामार्ग : तिलारी येथे गोमांस वाहतुकीच्या संशयावरून झालेली मारहाण व कार जाळपोळ प्रकरणी श्याम दत्ताराम गोवेकर (४९, साटेली भेडशी) व अरविंद सखाराम धर्णे (३५, साटेली गावठाणवाडी) यांची जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हि. एस. देशमुख यांनी सशर्त जामीनावर मुक्तता केली आहे. मात्र अन्य चार व्यक्तींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
तिलारी येथे गोमांस वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून काहींनी एकाला बेदम मारहाण करून त्याची कार जाळल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी घडली होती. मारहाण झालेल्या व्यक्तीला त्याच्या कार सहित एक पोलीस कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी त्याला येथील पोलीस ठाण्यात आणत असताना हा प्रकार घडला होता. या पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून ५० ते ६० युवकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून यातील १६ संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
यातील सिताराम उर्फ राज राजन तांबे, महेश बाळू धर्णे व कलैया रुद्रय्या हिरेमठ या तिघांची न्यायालयाने १७ ऑक्टोबर रोजी मुक्तता केली. या प्रकरणातील इतर संशयित आरोपी असलेले श्याम दत्ताराम गोवेकर व अरविंद सखाराम धर्णे या दोघांची सशर्त जामिनावर मुक्तता करण्यात आली. मात्र आनंद अंकुश तळणकर (५२ वर्षे, रा. झरेबाबर-काजुळवाडी ), गणपत पुरुषोत्तम डिंगणेकर (५४ वर्षे, मु पो. साटेली भेडशी ), वैभव वसंत रेडकर (३६ वर्षे, मु.पो. कसई दोडामार्ग, सावंतवाडा, ) विशाल सुभाष चव्हाण (३४ वर्षे, मु. पो दोडामार्ग, सुरुचीवाडी ) या चौघांचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.














