
सावंतवाडी : शहरात बाजारपेठेतील एका कॅफे मालकावर काल रात्री काही जणांनी हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात कॅफे मालक मौहसीन शब्बीर तांबोळी (रा. कोलगाव दरवाजा ) गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध सावंतवाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ओमकार गावकर आणि सोहेल मुजावर (दोन्ही रा. सावंतवाडी) हे चारचाकी वाहनातून एका हॉटेलच्या आवारात आले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडताना तो दरवाजा फिर्यादी मौहसीन तांबोळी यांना लागला. याबाबत त्यांनी दोघांना विचारणा केली असता आरोपींनी संतापून डस्टबिनच्या डब्याने तांबोळी यांच्या डोक्यावर प्रहार केला. तसेच लाथाबुक्क्यांनी आणि हाताच्या थपडा मारून मारहाण करत शिवीगाळ केली. या हल्ल्यात मौहसीन तांबोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सात टाके पडले आहेत. जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध सावंतवाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार महेश जाधव करीत आहेत. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली आहे.














