150 वर्षांचे 'हेरिटेज' वडाची फांदी तोडल्याने खळबळ

सर्वपक्षीयांची पोलीस ठाण्यात धाव
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: December 18, 2025 13:36 PM
views 151  views

कुडाळ : कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिजामाता चौक पुतळ्यासमोरचे सुमारे १५० वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक वडाचे झाडाची फांदी अज्ञात इसमांनी बेकायदेशीरपणे तोडल्याची धक्कादायक घटना सोमवारी, १५ डिसेंबर रोजी पहाटे २:४५ च्या सुमारास घडली. या घटनेमुळे कुडाळमधील वृक्षप्रेमी आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आज कुडाळ पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.

घटनेचा तपशील आणि नुकसान

मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ नगरपंचायत हद्दीतील हे वडाचे झाड अत्यंत पुरातन होते. सोमवारी पहाटे अज्ञातांनी हे झाड तोडले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र झाड पडल्याने जवळच असलेल्या दोन दुकानांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, या झाडाची गणना 'हेरिटेज ट्री' (वारसा वृक्ष) मध्ये केली जाते.

प्रशासकीय दिरंगाईवर संताप

यापूर्वीही या मार्गावरील काही झाडे तोडण्यात आली होती. त्यासंदर्भात २९ मे २०२५ रोजी ग्रामीण रुग्णालय कुडाळच्या वैद्यकीय अधीक्षकांनी गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळेच अशा प्रवृत्तींचे धाडस वाढत असून, ऐतिहासिक झाडे नष्ट केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

काय सांगतो कायदा?

 महाराष्ट्र झाड संरक्षण व जतन कायदा (१९७५): या कायद्यानुसार, खाजगी जागेतील झाड तोडण्यासाठीही स्थानिक प्रशासनाची लेखी परवानगी अनिवार्य आहे.

  हेरिटेज ट्री नियम (२०२१): महाराष्ट्र सरकारने ५० वर्षांहून अधिक वय असलेल्या झाडांना 'वारसा वृक्ष' दर्जा दिला आहे. अशा झाडांची कत्तल करणे हा गंभीर गुन्हा असून त्यासाठी कडक दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईची तरतूद आहे.

वृक्षप्रेमींची आक्रमक भूमिका

या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि दोषींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी कुडाळमधील सर्वपक्षीय नेते आणि वृक्षप्रेमींनी पोलीस ठाणे गाठत पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना निवेदन दिले. यावेळी प्राजक्ता आनंद शिरवलकर, श्रीराम शिरसाट, बबन बोभाटे, ओंकार तेली, चांदणी कांबळी, नयना मांजरेकर, मंदार श्रीकृष्ण शिरसाट, मंदार चंद्रकांत शिरसाट, गुरुनाथ गडकर, संदीप कोरगावकर, अमरसेन सावंत, अभय शिरसाट आणि मोठ्या संख्येने कुडाळ शहरवासीय उपस्थित होते.

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे.