
मालवण : वायरी भूतनाथ येथील सिद्धेश मडये यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून आतील रोख रक्कम सोन्याचे दागिने असा सुमारे २० हजार ५०० चा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. याबाबतची फिर्याद क्रांती मडये यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वायरी भूतनाथ येथे सिद्धेश मडये यांचे घर आहे. ते आपल्या पत्नीसह तेथे वास्तव्य करतात. सिद्धेश हे कामानिमित्त मुंबई येथे गेले होते तर त्यांची पत्नी माहेरी गेली होती. या संधीचा फायदा उठवीत मध्यरात्री अनोळख्या चोरट्यांनी बंद घर फोडले. घरात प्रवेश करून रोख १० हजार रुपये, ५ हजार ५०० रुपये किंमतीच्या तुटलेल्या सोनसाखळीचे तुकडे, कानातील बारीक सोन्याचे जुने दागिने, ४ हजार रुपयांचा जुना मोबाईल, १ हजार रुपयांचा सीसीटीव्ही कॅमेरा असा सुमारे २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अनोळख्या चोरट्यांनी लंपास केला.
आज सकाळी ही चोरीची घटना उघडकीस आली. स्थानिकांनी या घटनेची माहिती मडये कुटुंबियांना दिली. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक गणेश माने यांनी अन्य पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याबाबतची तक्रार क्रांती मडये यांनी पोलीस ठाण्यास दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश माने तपास करत आहेत.