LIVE UPDATES

खळबळ ; 25 वर्षांच्या तरुणीचा पाण्यात तरंगताना दिसला मृतदेह

Edited by: विनायक गावंस
Published on: July 09, 2025 13:28 PM
views 980  views

सावंतवाडी : इन्सुली - कोठावळेवाडी येथील सोनाली प्रभाकर गावडे (वय २५) या तरुणीचा मृतदेह आज सकाळी शेळजमिनीतील पाण्यात तरंगताना आढळून आला. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सोनाली ही इन्सुली येथील साऊथ कोकण डिस्टलरीज कंपनीत कामाला होती. 

वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी दिलेल्या वैद्यकीय अहवालानुसार, तिचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सोनाली ही दररोज सकाळी पायी झाराप-पत्रादेवी बायपासवर यायची‌. तेथून कंपनीच्या गाडीने कामावर जायची. काल सकाळी ती नेहमीप्रमाणे जेवणाचा डबा घेऊन कामावर जाण्यासाठी निघाली होती. तर तिचे वडील शेर्ला येथील सॉ मिलवर कामावर गेले होते. मात्र, काल सायंकाळी ती कामावर पोहोचली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र तिचा शोध घेतला, परंतु ती आढळून न आल्याने रात्री बांदा पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आज सकाळी, ज्या पायवाटेने सोनाली कामावर जायची, त्या पायवाटेजवळील शेळ जमिनीतील पाण्यात तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेह तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.

वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी शवविच्छेदन केले असून, तिचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा अहवाल त्यांनी पोलिसांना दिला आहे. यावेळी बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.