
कणकवली : घरात साफसफाई करण्यासाठी सांगितलेल्या कामगारांनी काम न केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून कल्लू रस्पाल निसाद (२६, सध्या रा. जानवली, वाकाडवाडी, मूळ रा. उत्तरप्रदेश) याच्यावर तिघांनी ब्लेडने हल्ला केला. ही घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कणकवली पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून दोघांना बुधवारी अटक केली. दोघांना येथील न्यायालयात हजर असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील पवण निसाद हा संशयित फरारी आहे.
कल्लू निसाद याला प्रेमचंद्र निसाद (३५), संतराम निसाद (३८), पवन निसाद (३५, सर्व रा. जानवली, वाकडवाडी, मूळ रा. उत्तरप्रदेश) यांनी ब्लेडने हल्ला केला होता. या हल्ल्यात कल्लू हा जखमी झाला. याबाबत खबर जखमी कल्लू याने कणकवली पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी प्रेमचंद निसाद, संतराम निसाद यांना अटक बुधवारी अटक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र नानचे करीत आहेत.