
मालवण : सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मालवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत गांजासह दोन मोटारसायकल, सहा मोबाईल आणि इतर वस्तू मिळून एकूण १ लाख १७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना मालवण तालुक्यातील वराड, कुसरवे इथ ३१ जुलै २०२५ रोजी रात्री ८:१५ वाजता घडली. याप्रकरणी ताब्यात घेतलेले संदीप विनायक परब (वय ४१), अविरत गणेश ढवण (वय ३१), हेमंत अनिल भोगले (वय २४), आणि आकाश शिवाजी निकम (वय २४) अशी आरोपींची नाव आहेत. यात २६२ ग्रॅम गांजा (किंमत ७,२०० रुपये), दोन मोटारसायकल, सहा मोबाईल, इतर वस्तू असा एकूण १ लाख १७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक कुमारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कोल्हे, पीएसआय हाडळ, जीपीएसआय शेळके यांच्यासह हवालदार कदम, तवटे, देसाई, डिसोझा, खानोलकर, कांडर आणि पोलीस कॉन्स्टेबल कांबळे यांच्या पथकाने केली आहे. या घटनेमुळे मालवण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.