
बांदा : बांदा मुस्लिमवाडी येथील आफताब कमरूद्दीन शेख या युवकाच्या आत्महत्येप्रकरणी अजूनही संशयितांवर गुन्हा दाखल न झाल्याने स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नातेवाईकांनी ऑनलाईन तक्रार दाखल करूनही बांदा पोलिसांकडून ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिठकरी यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली. त्यांनी तातडीने निष्पक्ष तपास सुरू करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
दरम्यान, पक्षाचे युवानेते अनंतराज नंदकिशोर पाटकर यांनी सांगितले की, “जर प्रशासनाने दुर्लक्ष केले तर आम्ही शांत बसणार नाही. न्याय मिळेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक पवित्रा घेईल.” मृतकाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा असल्याचेही नेत्यांनी स्पष्ट केले आहे.













