बँकेची APK फाईल डाउनलोड केल्यानंतर अकाऊंट खाली

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: November 19, 2025 13:18 PM
views 92  views

कुडाळ : मित्राने व्हाॅट्सअॅपद्वारे पाठवलेली एका राष्ट्रीयकृत बँकेची एपीके ही फाईल डाउनलोड केल्या नंतर कुडाळ तालुक्यातील एका युवकाचे 65 हजार 889 एवढी रक्कम त्याच्या सेव्हिंग खात्यातून गायब झाली. या प्रकरणी संबंधित युवकाने कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात कुडाळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 17 ऑक्टोंबर रोजी घडली. संबंधित युवकाने  दिलेल्या ऑनलाईन तक्रारीनुसार प्राथमिक तपास करून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली. 

संबंधित युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, 17 ऑक्टोबर 2025  रोजी  त्याच्या मित्राने व्हाॅट्सअॅप द्वारे पाठवलेली शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेची एपीके ही फाईल त्याने डाउनलोड केली. ही एपीके फाईल डाऊनलोड केल्यानंतर या युवकाची ऑनलाइन माहिती प्राप्त करून घेऊन त्याच दिवशी दुपारी 3 ते  सायंकाळी 6 वाजण्याच्या मुदतीत एका राष्ट्रीयकृत बँकेच्या  कुडाळ शाखेतील सेव्हिंग खात्यामधील 65 हजार 889 अज्ञाताने बँक ट्रांजेक्शनद्वारे रकमेची ऑनलाइन फसवणूक केली. मित्राने बँक ऑफ इंडियाचा लोगो असलेली फाईल पाठविली. या बँकेच्या लोगोवर बँक ऑफ इंडिया रिवार्ड असे नमूद केले होते. ही फाईल या युवकाने लागलीच आपल्या मोबाईलला डाऊनलोड केली. फाईल डाऊनलोड होताच आपला मोबाईल नंबर नमूद करण्यास सूचित करण्यात आले. त्यानंतर तेथे दिसलेला ऑटो कॅप्चाही टाकला. पहिल्यांदा 25  हजार रु, दुसऱ्या वेळी 25 हजार रु,तिसऱ्या वेळी 5 हजार रु., चौथ्या वेळी 5 हजार रु., पाचव्या वेळी 3 हजार  67 रु., व सहाव्या वेळी 2 हजार 821 रु. असे एकूण 65 हजार 889 एवढ्या रकमेची फसवणूक करण्यात आली. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने शहरातील एका  राष्ट्रीयकृत बँकेचा लोगो वापरून संबंधित युवकाची विश्वासार्हता प्राप्त करीत ही फसवणूक केली.