
दोडामार्ग : गोवा बनावटीची दारू तिलारी घाट माथ्यावर नेत असताना चंदगड पोलिसांनी कारवाई केली. यात एकूण 42 लाख 12 हजार 880 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र जुगार, दारू व सर्वच अवैद्य धंद्यांविषयी एक अभियान हाती घेतलेले असताना सिंधुदुर्गच्या चेक पोस्टवरून ही अवैध दारू घाट माथ्यावर गेलीच कशी? या संदर्भात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घाट माथ्यावर जाण्यासाठी एकतर दोडामार्ग विजघर चेकपोस्ट व दुसरे आंबोली चेकपोस्ट अशी दोन चेक पोस्ट आहेत. गोवा बनवटीची दारू घाट माथ्यावर वाहतूक करताना याच दोन चेक पोस्टचा अवैध धंदेवाले उपयोग करतात. पालकमंत्री नितेश राणे यांची अवैध धंद्यावर धडक कारवाई नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैद्य धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. काही दिवस गुटखा, दारू जुगार सिंधुर्गात बंद ठेवण्यात आला होता मात्र पुन्हा अवैद्य धंदे करणाऱ्यांनी डोके वर काढून अवैद्य धंदे सुरू केले आहेत. दोडामार्ग तालुक्यातून वीज घर चेक पोस्ट दिलारी घाट, कुंभवडे , मांगेली या सारख्या मार्गारून मोठ्या प्रमाणात दारू, गुटखा, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मांस खुलेआम वाहतूक केले जाते. हे कोणाच्या आशीर्वादाने केले जाते? याचा मुख्य आका कोण? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
गुरुवारी चंदगड पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शना खाली चंदगड पोलिसांनी दारूचे मोठे घबाडावर मोठी कारवाई केली आहे. यात दोडामार्ग, गोवा, व घाट माथ्यावरील काही युवक असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोडामार्ग मणेरी धनगरवाडी येथील विजय वसंत झोरे 33, धुळो निणू फोंडे 30, सागर नाईक व अन्य 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील 3 संशयित आरोपी फरार झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.
ती दारू विजघर चेकपोस्टवरून गेलीच कशी?
गुरुवारी गोवा बनावटीची दारू घाटमाथ्यावर बेकायदेशीर वाहतूक करताना चंदगड पोलीसांनी डंपर व दोन कार ताब्यात घेत तिलारी नगर येथे ही कारवाई केली. जर ही कारवाई तिलारी नगर येथे होते तर ती दोडामार्ग मध्ये का नाही? चंदगड पोलिसांना विचारले असता सदरची दारू दोडामार्ग तिलारी घाट मार्गेच ती बेळगावला नेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मग हा दारूने भरलेला डंपर व त्याच्या मागून असलेल्या दोन कार या दोडामार्ग विजघर चेकपोस्टवरून पुढे गेल्याच कशा? या संदर्भात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सर्व विषयाची सखोल चौकशी होणार काय? जिल्हा पोलीस अधीक्षक याची चौकशी करणार काय? अनेक प्रश्न आता तरी उपस्थित होऊ लागले आहेत.
विजघर चेकपोस्टवर पोलीस कोण होते?
गुरुवारी रात्री चंदगड पोलिसांनी तिलारी नगर येथे दारू पकडली. दारूने भरलेला डंपर व त्या दोन कार विजघर चेकपोस्टवरून तिलारी घाट मार्गे पुढे गेले त्या रात्री विजघर चेकपोस्टवर कोण पोलीस होते? त्यांनी त्या गाड्या पुढे सोडल्या कशा, काय त्या गाड्या पोलीसांच्या नजरेत धूळफेक करून गेल्या? अशा प्रकारे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या सर्व प्रश्नांचे उत्तर कोण सोडवणार हे ही तितकेच महत्वाचे आहे.
दोडामार्गमधील युवकांचा समावेश
काही दिवसांपूर्वी तिलारी घाट रस्त्यावरून गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना दोडामार्ग येथील मणेरी येथील युवकावर पोलिसांनी कारवाई केली होती. असे असताना गुरुवारी चंदगड येथे पकडलेल्या दारू वाहतुकीत दोडामार्गचेच काही युवक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मग दोडामार्ग पोलीस यावर कारवाई का करत नाही? असा सवाल उपस्थित होतोय.














