
सावंतवाडी: सावंतवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. माजगाव-गोठणेश्वर येथे नाकाबंदी दरम्यान एका महिंद्रा झायलो वाहनातून (क्र. GA 03R- 7793) सुमारे 290 किलो गोवंश सदृश्य प्राण्याचे मांस विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे वाहतूक करताना दोन आरोपींना अटक केली आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली आहे.
ही कारवाई २६ सप्टेंबर रोजी पहाटेच्या वेळेत करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मांस कर्नाटकातून गोव्याकडे नेले जात होते. नाकाबंदी दरम्यान ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळावरून वाहनचालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे. यात
गौस मुजावर (वय ३७, रा. म्हापसा, गोवा), रबानी भंडारी (वय ३०, रा. हनगल, कर्नाटक) यांना ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेले वाहन आणि मांस पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम ५, ९ आणि मोटार वाहन कायदा १९२ तसेच इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. अशा प्रकारच्या अवैध मांस किंवा प्राणी वाहतुकीची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.