
गोवा: गोव्यात धारगळ येथील एका कॉलेज विद्यार्थ्यांवर ॲसिड फेकल्याप्रकरणी संशयित नीलेश देसाई याला न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली सुनावली आहे. या प्रकरणी कळणे-दोडामार्ग येथील नीलेश गजानन देसाई याला पेडणे पोलिसांनी सोमवारी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या ॲसिड हल्लात जखमी युवकाची तब्बेत हळू हळू सुधारत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीवेळी आरोपीने गुन्हा मान्य केला आहे. ज्या कंपनीत तो कामाला होता, तेथून त्याने ॲसिडसदृश द्रवाचा पाच लिटरचा कॅन चोरून आणला होता. मागील आठवड्यापासून तो करासवाडा-म्हापसा येथील एका कंपनीत माळी म्हणून काम करत होता. आता त्याला ३ जुलै रोजी पणजी येथील बाल न्यायालयातही त्याला हजर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, जखमी झालेल्या युवकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सोमवारी रात्री उशिरा गोमेकॉतील डॉक्टरांनी दिली होती. त्याची उजवी बाजू भाजली आहे. सध्या तो व्हेंटिलेटरवर आहे. एकतर्फी प्रेमाची किनार असल्याने ॲसिड फेकण्याचा प्रकार एकतर्फी प्रेमातून झाल्याचा दावा जखमी युवकाचे वडील उमेश शेट्ये यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताची मुलगी आणि जखमी युवक म्हापशातील एका उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत होते. तिथेच त्यांची मैत्री झाली. एकमेकांशी फोनवर बोलणे, एसएमएस पाठवणे सुरू होते. एके दिवशी ती पाठलाग करत मुलाच्या घरात आली होती. मुलाच्या आईला तिने आपण त्याच्यावर प्रेम करत असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. मुलाने मात्र आपण प्रेम करत नसल्याचे म्हटले होते. मुलाच्या आई-वडिलांनी तिची समजूत काढून तिला घरी पाठवले होते. तरीदेखील ती मुलाला एसएमएस पाठवून जीव देण्याची धमकी देत होती. ती गोमेकॉत अॅडमिट झाल्याचे आम्हाला तिच्या मावशीकडून समजले होते. तिची मावशी जुने गोवा पोलीस स्थानकात सेेवा बजावत आहे. त्या मुलीची आम्ही गोमेकॉत जाऊन विचारपूस केली. ती बोलण्याच्या स्थितीत नव्हती. तिचे वडील संशयित नीलेश यांनी आम्हाला ‘तुम्ही घाबरू नका, तुमची चूक नाही’, असे सांगितले होते. त्यानंतर आठ दिवसांनी मुलीचा मृत्यू झाल्याचे समजले. संशयित आणि मुलीच्या मावशीने दोडामार्ग पोलीस स्थानकात आमच्याविरोधात तक्रार दाखल केली. ती तक्रार मोपा पोलीस स्थानकाकडे हस्तांतरित करण्यात आली. आम्ही पोलिसांना सर्व माहिती दिली. तिने पाठवलेले एसएमएसही त्यांना दाखवले. मात्र मुलीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी संशयिताने कटकारस्थान रचले. यात आणखी कुणाचा तरी हात असण्याची शक्यता आहे. यात तिच्या मावशीचा हात असू शकतो. संशयिताच्या मुलीचा मृत्यू कावीळमुळे झाला आहे. तसा अहवाल हॉस्पिटलने पोलिसांना सादर केला आहे. त्यामुळे तिच्या मृत्यूशी आमचा काहीही संबंध नाही, असे उमेश शेट्ये यांनी स्पष्ट केले.
पोलिसांकडून कसून तपास सुरू
दरम्यान संशयित नीलेश देसाई याच्या शरीरावर ॲसिडचे डाग मिळतात का, हे शोधण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचे हेल्मेट, रेनकोट आणि ॲक्टिवा स्कूटर पोलिसांनी जप्त केली आहे. ॲक्टिवा स्कूटरवर ॲसिडचे डाग आढळल्याने स्कूटरची ठसे तज्ज्ञांनी तपासणी केली. ॲसिड कॅनची चोरी केल्याबद्दल त्याच्याविरोधात म्हापसा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयिताच्या विरोधात १२४ (१) १०९ आणि गोवा बाल कायद्याच्या कलम ८/२ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पेडणे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे पुढील तपास करीत आहेत.
निलेश म्हणतोय त्या युवकांमुळेच मुलीचा बळी
आरोपी निलेश देसाई म्हणतोय मुलीच्या मृत्यूस तो युवकचं जबादार आहे. मुलीच्या मोबाईल मध्ये असलेले चॅटिंग आणि आक्षेपार्ह फ़ोटो यामुळे मुलीने जीवाचं वाईट करून घेतलं. त्यामुळ त्याला धडा शिकविण्यासाठी आपण असं टोकाचं पाऊल उचललं. असा जबाब त्याने गोवा पोलिसाना देत गुन्हा कबूल केला होता.
जखमी युववकाचा उपचारांना प्रतिसाद
दरम्यान त्या जखमी युवकांवर गोमेकोत उपचार सुरु असून तो उपचाराना काहीसा प्रतिसाद देत आहे. मात्र अद्यापही तो बोलण्याच्या मनस्थितीत नाही. शिवाय त्याचेवर प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आली असून तो शुद्धीत आल्यावर अधिक उपचार केले जाणार आहेत. दरम्यान या साऱ्या प्रकाराने गेले दोन दिवस गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.