
सावंतवाडी : माजगाव परिसरात आज सकाळी सहासीटर चालक श्री. पेडणेकर यांच्या वाहनाला गवा-रेड्याने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात मोठी हानी झाली नसली तरी वाहनाचे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांत या भागात गवा-रेडे रस्त्यावर येण्याच्या घटनांत वाढ झाली असून यामुळे सतत अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार घडत असलेल्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर उपसरपंच संतोष वेजरे व संजय कांसे यांनी वनविभागाला तातडीने गवा-रेड्यांचा बंदोबस्त करण्याचे आवाहन केले आहे.
अपघात रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत तर आम्हाला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी वनविभागाला दिला आहे. स्थानिक ग्रामस्थांनीही या परिसरात गवा-रेड्यांच्या वावरावर नियंत्रण आणण्यासाठी त्वरित कारवाईची मागणी केली आहे.














