
सावंतवाडी : मच्छी मार्केटसमोर काल रात्री झालेल्या अपघातात चार दुचाकींचे नुकसान झाले असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सावंतवाडी पोलिसांकडून देण्यात आली आहे.
येथील हर्षद सुनील मेस्त्री (वय २१, रा. माठेवाडा झिरंगवाडी) हा जिमला गेला होता. त्यावेळी त्याची बुलेट गाडी आणि त्याच्या सोबतच्या इतर तीन दुचाकी अशा एकूण चार गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. त्याचवेळी हरीश्चंद्र शिवशरण कुमार जयस्वाल (वय २७, रा. शिरोडा नाका) याने दारूच्या नशेत टाटा गाडी (क्रमांक GA 03 T 5555) बेदरकारपणे चालवत या चारही दुचाकींना जोरदार धडक दिली. यात दुचाकींचे मोठे नुकसान झाले.
याप्रकरणी पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या हरीश्चंद्रसह टेम्पो मालक सुनील बळवंत केळूसकर (वय ५०, रा. माठेवाडा सावंतवाडी) यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार श्री. शिंगाडे करत आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक पंकज शिंदे, पोलिस उपनिरीक्षक सरदार पाटील, पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे, संभाजी धुरी, महेश जाधव, श्री. सावंत, अमित राऊळ, मयूर निरवडेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. त्यानंतर आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी नेत परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवले.