
दोडामार्ग : समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या एसटी बसला दुचाकीने धडक दिल्याची भीषण दुर्घटना मंगळवारी सायंकाळी दोडामार्ग तालुक्यातील केळीचे टेंब येथे घडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, एसटी बस चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या बाजूला घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मांगेली येथील एक युवक मंगळवारी सायंकाळी सुमारे ६:१५ वाजण्याच्या सुमारास आपल्या होंडा अॅक्टिव्हा दुचाकीवरून दोडामार्गहून घरी जात होता. दोडामार्ग–केळीचे टेंब येथील तीव्र वळणावर समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा तो प्रयत्न करीत असताना, साटेली-भेडशी येथून दोडामार्गच्या दिशेने येणारी एसटी बस समोर आली.
दुचाकीस्वार ओव्हरटेक करत असल्याचे लक्षात येताच एसटी चालकाने तात्काळ बस रस्त्याच्या बाजूला घेतली. मात्र तोपर्यंत दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि त्याने एसटी बसला चालकाच्या बाजूने जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी बसला घासत जाऊन एसटीच्या दोन्ही चाकांच्या मधोमध अडकली.
या अपघातात दुचाकीस्वाराच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित मार्गस्थ नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत रुग्णवाहिकेला पाचारण केले व जखमीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत अपघाताचा रीतसर पंचनामा केला. एसटी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी आल्यानंतर बस तेथून हलवण्यात आली.














