दिवसाढवळ्या घरफोडी ; 5 तोळे दागिने लंपास

Edited by: विनायक गांवस
Published on: July 22, 2025 18:08 PM
views 318  views

सावंतवाडी : तालुक्यातील ओटवणे येथली मांडवफातरवाडीतील रामचंद्र विष्णू वरणेकर यांच्या घरात दिवसाढवळ्या घरफोडी झाली आहे. यात अज्ञात चोरट्याने सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास केलेत. ही घटना आज दुपारीच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

श्री. वरणेकर यांच्या पत्नी रंजना वरणेकर यांच्या डोळ्यादेखत चोर पसार झाला. या घटनेमुळे ओटवणे गावात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रामचंद्र वरणेकर हे माजगाव येथे कामावर गेले होते. त्यांच्या पत्नी रंजना शेजारील घरात होत्या. दुपारी त्या घरी परतल्या असता त्यांना घराबाहेर एक पिवळी मोटारसायकल उभी दिसली. त्यांना संशय आल्याने त्यांनी घराकडे धाव घेतली.घराचा दरवाजा आतून बंद होता. घरात कोणीतरी आल्याचे लक्षात येताच चोरट्याने मागच्या दाराने पळ काढला. यावेळी रंजना वरणेकर यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतू, चोर त्यांच्या डोळ्यादेखत पळून गेला. यात घरातील सोन्याचे दागिने चोरून नेले असून यात सुमारे ५ तोळे दागिने असल्याचा दावा केला आहे.

घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, हवालदार मनोज राऊत यांनी तपासकार्य सुरू केल आहे. यावेळी ओटवणे पोलीस पाटील शेखर गावकर, संतोष तावडे, विनायक वरणेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.