
कणकवली : कुटुंबियांच्या रागातून घरातून पळून आलेल्या पंधरा वर्षीय मुलाला रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) कर्मचाऱ्यांनी कुडाळ रेल्वे स्थानक येथे ताब्यात घेतले. हा प्रकार रविवारी रात्रीच्या सुमारास घडला. आरपीएफच्या पथकाने योग्य शोध मोहीम राबवत सदर मुलास शोधून काढले, याबद्दल गोवा पोलिसांनीही अभिनंदन करतानाच आभारही मानले.
हा मुलगा गोवा येथील असून काही घरगुती रागातून तो कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेला होता. याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी गोव्यातील पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दिली होती. गोवा पोलिसांनी सदरबाबत गोवा येथील रेल्वे सुरक्षा बलाची संपर्क साधला होता. तेथून ही माहिती कणकवलीच्या आरपीएफ कार्यालयाला देण्यात आली.
त्यानुसार रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक राजेश सुरवाडे, सहाय्यक उपनिरीक्षक दुर्गेश यादव, हवालदार युवराज पाटील यांनी कणकवली रेल्वे स्थानक येथे कंट्रोल असलेल्या जिल्हाभरातील सर्व स्थानकांचे सीसीटीव्ही तपासले. यामध्ये सदर मुलगा रात्री ९ वा. सुमारास कुडाळ रेल्वेस्थानक येथे उतरल्याचे दिसून आले. आरपीएफ चा कर्मचाऱ्यांनी तात्काळ कुडाळ रेल्वे स्थानक येथे धाव घेतली व सदर मुलाला ताब्यात घेतले. तर दुसऱ्या दिवशी येथे दाखल झालेल्या गोवा पोलिसांकडे त्याला सुपूर्द करण्यात आले. आरपीएफच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे