विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणी संशयित निर्दोष

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 17, 2025 21:04 PM
views 69  views

देवगड : देवगड मधील एका ग्रामीण भागातील अल्पवयीन विद्यार्थीनीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो कायदा कलम ४, ५, ६ अंतर्गत सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात दाखल खटल्यातील संशयित बबन उर्फ चंद्रकांत आत्माराम तांबे याची सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपांमधून प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ.सुधीर देशपांडे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयित आरोपीच्यावतीने देवगड येथील ॲड. कौस्तुभ मराठे यांनी काम पाहिले.

एप्रिल २०१९ मध्ये दुपारच्या वेळेस पीडित विद्यार्थीनी आपल्या घरी असताना संशयित बबन उर्फ चंद्रकांत आत्माराम तांबे याने मागील दरवाज्याने घरात घुसून स्वयंपाक घरात पिडीतेवर जबरदस्तीने अत्याचार केला.याबाबतची फिर्याद पिडीतेच्या आईने पोलीस स्टेशन येथे नोंदवली होती. सदर घटनेनंतर या प्रकरणातील पिडीत मुलीला मानसोपचारांसाठी रत्नागिरी मनोरुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते.पोलीसांनी तात्काळ संशयित आरोपीविरुध्द पोक्सो कायदा कलम ४, ५, ६ सह भा.दं.वि.कलम ३७६ (२) व कलम ३२३ अंतर्गत गुन्हा दाखल  करून अटक केली होती. दरम्यान सदरचा खटला सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात चालला होता.सरकार पक्षाने एकूण १० साक्षीदार तपासले होते.तथापि पिडीतेची वैद्यकीय पुराव्यातील विसंगती,पिडीतेची जन्मतारीख शाबित न होणे इत्यादी मुद्याच्या आधारे न्यायालयाने संशयिताची निर्दोष मुक्तता केली आहे.