
सावंतवाडी : सावंतवाडी येथील जेलच्या मागील परिसर व शिल्पग्राम परिसरात ९ जुलै रोजी झालेल्या घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आणि 'हड्या - गुड्या' गँगमधील आरोपी देवगन विजय उर्फ बापू पवार (वय २४, रा. आटपाडी, सांगली) याला सावंतवाडी पोलिसांनी सांगली शहरातून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. सांगली-आटपाडी पोलिसांच्या मदतीने सावंतवाडी पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.
या गुन्ह्याचा तपास करत असलेले सहायक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर आणि गौरव परब यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सांगली येथे धाव घेतली. स्थानिक सांगली आणि आटपाडी पोलिसांच्या सहकार्याने आरोपी देवगन पवार याला सांगली शहरातून ताब्यात घेण्यात आले. अटक केल्यानंतर संशयित देवगन पवार याला तत्काळ सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला अधिक तपास करण्यासाठी सोमवारपर्यंत ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात त्याच्याकडून गुन्ह्यातील इतर माहिती व चोरीच्या मालाबाबत तपास केला जाणार आहे. विशेषबाब म्हणजे, अटक करण्यात आलेला आरोपी देवगन पवार हा गोवा राज्यातील पेडणे येथे झालेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्यात देखील गोवा पोलिसांना हवा होता. गोवा पोलिसांचे एक पथकही त्याच्या मागावर होते. सावंतवाडी पोलिसांनी त्याला अटक केल्यामुळे गोवा पोलिसांच्या तपासालाही मदत मिळण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यात यापूर्वीच अटक करण्यात आलेले इतर आरोपी जुलै महिन्यापासून अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत. मुख्य आरोपीच्या अटकेमुळे या संपूर्ण गुन्ह्याच्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.














