
वेंगुर्ले : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार उद्या २४ एप्रिल रोजी खासगी दौऱ्यावर वेंगुर्ले येथे येणार आहेत. या एकदिवसीय दौऱ्यात ते सकाळी ११ वाजता वेंगुर्लेतील बॅ. नाथ पै स्मृती व समुदाय केंद्र येथे भेट देणार असून केंद्राची विकास प्रक्रिया आणि तेथे चालणाऱ्या उपक्रमांची माहिती घेणार आहेत. तसेच या दौच्यात शरद पवार वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्र तसेच फोमेंतो कंपनीच्या 'आराकिला' या पंचतारांकित हॉटेलला भेट देणार आहेत. या दौऱ्याचे आयोजन व्हिक्टर डॉन्टस यांच्या आतिथ्याखाली करण्यात आले आहे.
शरद पवार यांनी यापूर्वी ऑक्टोबर २०२२ मध्ये नाथ पै यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने बॅ नाथ पै समुदाय केंद्राला भेट दिली होती. त्यावेळी या केंद्राच्या आराखड्याबद्दल त्यांना माहिती देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी नाथ पै यांच्यासारख्या थोर व्यक्तीच्या स्मृतीसाठी भव्य स्मारक उभारण्यास आपला पाठिंबा राहील, असे आवर्जून सांगितले होते. केंद्राच्या औपचारिक उद्घाटनानंतर सहा महिन्यांनी पवार पुन्हा एकदा येथे भेट देत आहेत. बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट या संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत व इतर संस्था व संघटनांसोबतच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांची ते माहिती घेणार आहेत.
या भेटीदरम्यान, जॅकफ्रुट किंग अॅग्रो प्रॉड्यूसर कंपनी लिमिटेड आणि नाथ पै फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक कृषीज्ञान केंद्र स्थापन केले जाणार आहे या केंद्रामार्फत शेतकऱ्यांना डिजिटल साधने आणि आधुनिक तंत्रज्ञान याबाबत शिक्षण दिले जाईल, जेणेकरून ते शेतीच्या क्षेत्रातील नवकल्पनांशी जोडले जाऊ शकतील. या कार्यक्रमात पवार विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि वेंगुर्ले नागरिकांना संबोधित करतील आणि सर्वसमावेशक विकासाचे महत्व अधोरेखित करतील.