मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या नव्या पालकमंत्रिपदाची घोषणा होताच काही नेत्यांमध्ये नाराजी दिसून आली. यात रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांच्याकडे, तर नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आले होते.
परंतु शिंदे गटाच्या पारड्यात रायगडचे पालकमंत्रिपद जाईल असे गोगावले समर्थकांना वाटत होते. मात्र, गोगावले यांना डावलून पुन्हा अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री करण्यात आले. या निर्णयावर आक्रमक होऊन गोगावले समर्थकांनी टायर जाळून निषेध केला. रविवारी दिवसभर शिवसेनेच्या नेत्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केल्यानंतर रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान आता इच्छुक मंत्र्यांची वर्णी लागेल का आणि यावर सरकार काय निर्णय घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.