बॅलेटसाठी बुलेट खाऊ ; ग्रामस्थ का झाले आक्रमक ?

Edited by: ब्युरो
Published on: December 03, 2024 10:59 AM
views 122  views

सोलापूर : विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन दहा दिवस उलटले, तरी महाराष्ट्रातील एका गावात मतदानाची गडबड सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या मारकडवाडी या गावात आज चक्क बॅलेट पेपरवर मतदान केले जाणार आहे. ईव्हीएममधील त्रुटींच्या विरोधात आंदोलन छेडणाऱ्या येथील ग्रामस्थांनी प्रशासनाचा विरोध झुगारुन मतपत्रिकांवर मतदान करण्याचा पवित्रा घेतला आहे.

मारकडवाडी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघांतर्गत येते. तिथे शरद पवार गटाच्या उत्तमराव जानकर यांनी भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांचा पराभव केला. जानकर विजयी झाले, पण त्यांच्या गावातील महाविकास आघाडी समर्थकांनी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ईव्हीएम मोजणीच्या आकड्यांवर आक्षेप घेतला आहे. कारण त्यांच्या गावात चक्क भाजप उमेदवाराला आघाडी मिळाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ‘पुनर्मतदाना’चा घाट घालण्यात आला आहे.

मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाकडे रीतसर निवेदन देत, फक्त मारकडवाडी गावापुरते बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशी मागणी केली होती. सोलापूर जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकारी यांनी विधानसभा निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली असून आता कोणत्याही प्रकारची निवडणूक प्रक्रिया राबविता येत नाही असे जाहीररीत्या सांगितले आहे. ईव्हीएममध्ये गैरप्रकार होत आहे ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही मतपत्रिकेवर मतदान घेणारच, लाठीचार्ज करा किंवा गोळीबार करा, परंतु आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेणारच अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.

सोलापूर जिल्हा प्रशासनाने काही गावकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. सोमवारपासूनच गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले की, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही खबरदारीसाठी नोटीस बजावली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे कोणतेही पाऊल टाळण्यासाठी प्रशासन ग्रामस्थांशी बोलून त्यांचे मन वळवत आहे.