कुडाळ : येथील हिंदू कॉलनीतील श्री गणेश हॉस्पिटलचे डॉ. संजय निगुडकर यांची सुकन्या डॉ. जुई निगुडकर हिने नुकत्याच जाहीर झालेल्या पोस्ट ग्रॅज्युएट नीट (PG - NEET) मध्ये ८०० पैकी ७१६ गुण मिळवून ऑल इंडिया लेव्हलवर सातवी रँक मिळविली. या यशाबददल कोकणचे नंबर वन महाचॅनेल कोकणसाद LIVE च्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. कोकणसाद LIVE चे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला. यावेळी डॉ. संजय निगुडकर, सौ. निगुडकर, सौ. बाणावलीकर, कार्यकारी संपादक अर्जुन धस्के, उपसंपादक आणि न्युज अंकर जुईली पांगम, गेस्ट अंकर आदीती बाणावलीकर उपस्थित होते.
संपूर्ण भारतभरातील एमबीबीएस उत्तीर्ण झालेले विद्यार्थी एमडी, एमएस, डीएनबी अशा पदव्युत्तर शिक्षणासाठी ही परीक्षा देतात. यावर्षी २ लाख ८ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात डॉ. निगुडकर यांनी सातवा क्रमांक पटकावला. त्या जीएस मेडिकल कॉलेज येथे शिकत होत्या. सध्या त्या केईएम रुग्णालयात इंटर्नशिप करीत आहेत. या देदिप्यमान यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा प्रवेश परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंतची सर्वांत अव्वल रॅंक डॉ. जुई यांनी मिळविली आहे. डॉ. जुई या नृत्य, संगीत, चित्रकला यामध्येही पारंगत आहेत.