संपाविरोधात गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात | संप बेकायदेशीर म्हणत याचिका दाखल

उद्या होणार तातडीची सुनावणी
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: March 16, 2023 12:15 PM
views 202  views

ब्युरो न्युज : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील 17 लाख कर्मचारी हे सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारची मोठी अडचण झालेली असतानाच आता या संपाविरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.


गुणरत्न सदावर्ते यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे. याप्रमाणे उद्यापासून (17 मार्च) सुनावणीला सुरुवात होणार आहे.


संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असू शकतात, मात्र हा संप बेदायदेशीर आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे या याचिकेवर आता उच्च न्यायालय काय निर्णय देणार?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


संपाचा तिसरा दिवस


जुन्या पेन्शनसाठी गेल्या तीन दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपामुळे विद्यार्थी आणि रुग्णांना हाल सहन करावे लागत आहेत. असा दाखला देत हा संप बेकायदेशीर असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.


सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. बुधवारपासून मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाईला सुरुवात झाली. याचे कारण म्हणजे राज्य सरकारने अभ्यास समिती गठीत करण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी तो समन्वय समितीला मान्य नाही.


सामान्यांचा खोळंबा


जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी होत असणाऱ्या या संपामुळे सामान्य जनतेचा खोळंबा होत आहे. अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गैरसोय झाल्याचे पहायला मिळाले. सरकारी कार्यालयातील कामकाजही ठप्प झाले आहे. तर, दुसरीकडे बारावी आणि दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या असल्या तरीही, शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याने दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल लागण्यास वेळ लागू शकतो.