मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक एप्रिलअखेरीस होणार आहे. या निवडणुकीसाठी पुन्हा नव्याने मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये विविध विद्यार्थी संघटना सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत, परंतु याआधी झालेल्या मतदार नोंदणी प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात गैरवापर झाला असून विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिंदे गटाच्या विधान परिषद आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे.
काही ठरावीक आयपी अॅड्रेसवरूनच मोठय़ा प्रमाणावर मतदार नोंदणी करण्यात आली आहे. तसेच काही ठरावीक बँक खात्यामधून मतदार नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे. मतदारांचा मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडीसुद्धा वगळण्यात आला आहे. तसेच सुरुवातीला असलेली ओटीपी पद्धतही बंद करण्यात आली. हे सर्व गैरप्रकार एका विशिष्ट संघटनेला फायदा होण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप डॉ. मनीषा कायंदे यांनी पत्रात केला आहे.