ठाकरेंना मोठा धक्का | मंत्री असलेला आणखी एक नेता शिंदे गटात

आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्री म्हणून केलं होतं काम
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: March 15, 2023 19:09 PM
views 210  views

मुंबई : माजी मंत्री सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करुन काही तास होत नाहीत, तोच उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. फडणवीस सरकारच्या काळात आरोग्य मंत्रालयाची धुरा सांभाळणाऱ्या डॉ. दीपक सावंत यांनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 


दीपक सावंत विधानपरिषदेवरील माजी आमदार आहेत. शिवसेनेकडून त्यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले. जुलै २००४ मध्ये त्यांची पहिल्यांदा विधानपरिषदेवर वर्णी लागली होती.


सेना-भाजप युती किंवा महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपद भूषवल्यानंतरही शिंदेंच्या गटात गेलेल्या नेत्यांमध्ये आता एकाची भर पडली आहे. आतापर्यंत रामदास कदम, अर्जुन खोतकर, तानाजी सावंत, विजय शिवतारे, दीपक केसरकर, दादा भुसे, उदय सामंत यासारखे अनेक कॅबिनेट अथवा राज्य मंत्रिपद भूषवलेले नेते शिंदेंच्या साथीला गेलेत.



दीपक सावंत यांनी विधानपरिषदेचे सदस्यत्व भूषवले आहे. शिवसेनेकडून त्यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. जुलै २००४ मध्ये त्यांची पहिल्यांदा विधानपरिषदेवर वर्णी लागलेली होती. त्यानंतर २००६ आणि २०१२ मध्ये ते पुन्हा निवडून आले. मात्र त्यांना तिसऱ्या वेळी तिकीट नाकारण्यात आले.


डिसेंबर २०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात दीपक सावंत यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. याचवेळी त्यांच्याकडे भंडारा आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती.