मुंबई : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अतिशय धाडसी वक्तव्य केलं आहे. ज्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयींना गर्दी जमवता आली नाही, तिथं सावंत बंधूंनी सात लाखांची गर्दी जमवून दाखवली, असं तानाजी सावंत एका कार्यक्रमात म्हणाले. मोठेपणाच्या ओघात आरोग्यमंत्री बोलून गेले असले तरी त्यांना स्वकीयांच्याच रोषाला सामोरं जावं लागणार हे स्पष्ट आहे. कारण बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयींपेक्षा आपण मोठे आहोत, हे त्यांनी एका वाक्यात सुचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकीकडे शिवसेना तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण भाजपचा रोष त्यांनी ओढावून घेतला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
ज्या ठिकाणी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सभेला गर्दी जमवता आली नाही त्या पंढरपूरमध्ये या सावंत बंधूनी 7 लाखांचा मेळावा घेण्याची कमाल घडवून आणली अशी दर्पोक्ती एका कार्यक्रमात बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी करत सावंत बंधू या नेत्यांपेक्षा किंवा भाजप, शिवसेनेपेक्षा कसे मोठे आहेत? हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.