
सिंधुदुर्ग : संगीत आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारा “Music Retouch” हा YouTube चॅनेल आता सिंधुदुर्गातील पहिला गोल्डन प्ले बटण मिळवणारा चॅनेल ठरला आहे. युट्युब कडून मिळणारे गोल्डन प्ले बटण हे एका मोठ्या टप्प्याचे प्रतीक मानले जाते, जेव्हा एखादा चॅनेल १० लाख (१ मिलियन) सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करतो, तेव्हा त्याला ही विशेष सन्मानचिन्ह प्रदान केले जाते.
“Music Retouch” हा चॅनेल प्रामुख्याने गाण्यांचे इन्स्ट्रुमेंटल कव्हर्स तयार करतो आणि संगीतप्रेमींसाठी अनोख्या पद्धतीने सादर करतो. हा चॅनेल फोंडाघाट, सिंधुदुर्ग येथील सुजित सामंत यांनी सुरू केला असून, त्यांच्या मेहनतीमुळे आणि अनोख्या संगीत शैलीमुळे तो अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. त्याच्या या यशामागे उत्कृष्ट संगीत रचनांची निर्मिती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि प्रेक्षकांशी सतत असलेला संवाद हे मुख्य घटक ठरले आहेत. बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार साजिद वाजीद तसेच छावा चित्रपटाचे अभिनेते विकी कौशल यांच्या सारख्या अनेक मोठ्या कलाकारांनी याच्या कलेचे कौतुक केले आहे. चॅनेलच्या संपूर्ण टीमने या अभूतपूर्व यशाबद्दल आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावर देखील चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संगीत क्षेत्रातील “Music Retouch” चे यश सिंधुदुर्ग जिल्यातील creators साठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.