अखेर ‘भिले खारभूमी' दुरूस्तीला सुरूवात

आ. शेखर निकमांच्या माध्यमातून ८३ लाख मंजूर
Edited by: मनोज पवार
Published on: March 27, 2025 16:26 PM
views 197  views

चिपळूण : खाडीपट्टयातील करंबवणे खाडीलगत असलेल्या भिले जांभुळवाडी खार भुमी विकास योजनेच्या दुरूस्तीसाठी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून एकूण ८३ लाखांचा निधी दोन वर्षभरापूर्वा मंजूर झाला. मात्र ठेकेदार काम सुरू करत नसल्याने दुरूस्ती रखडली आहे. अखेर आमदार निकम यानी काही दिवसांपूर्वा कडक शब्दात अधिकारी, ठेकेदारांला सुनावल्यानंतर नुकतीच कामाला सुरूवात झाली आहे.

समुद्राच्या भरतीचे खारे पाणी शेतात घुसून होणारे नुकसान टाळण्यासाठी खाडीकिनारी संरक्षक बंधारे बांधून संबंधित क्षेत्र लागवडीलायक करण्याच्यादृष्टीने खारभूमी विकास योजना राबवली जात आहे. भिले येथील या योजनेत गावच्या खाजन जमिनीच्या लगत असलेल्या करंबवणे खाडीला वळसा घालणारा दोन कि. मी. लांबीचा मातीचा बंधारा बांधण्यात आला आहे. या योजनेमुळे एकूण ८४ हेक्टर क्षेत्र हे लागवडीखाली असून त्यामध्ये ३८ हेक्टर क्षेत्र हे सरकारी मालकीचे आहे. त्यामुळे हे क्षेत्र लागवडीखाली येणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने या योजनेच्या दुरूस्तीची मागणी ग्रामस्थांनी सातत्याने आमदार निकम यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी या योजनेसाठी ८३ लाखांचा निधी मंजूर केला.

दरम्यान निधी मंजूर झाल्यानंतरही सबंधित ठेकेदार कामाला सुरूवात करत नव्हता. अशातच खाडीचे आतील भागात शिरलेले पाणी जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या उघाडीची दोन्ही झडपे ही मध्यंतरी जोरदार पावसाच्या पाण्यात निसटल्याने भरतीचे पाणी आतमध्ये घुसून बहूतांशी शेती ही पाण्याखाली गेली होती. 

गेली दोन वर्षे सातत्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत होते. शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन आमदार निकम यांनी पंधरा दिवसांपूर्वी खारभूमी विकास योजनेचे अधिकारी आणि ठेकेदार यांना काम सुरू करण्याबाबत सुनावल्यानंतर अखेर ठेकेदाराने कामाला सुरूवात केली आहे. या दुरूस्तीमध्ये बंधाऱ्याला भराव आणि दोन्ही बाजूला दगडी पिचिंग या कामाचा समावेश असून पाणी जाणे-येणेसाठी आणखी एक उघाडी मुखाजवळ उभारण्यात येणार आहे. आठवडाभरापासून कामाला सुरूवात झाली असून पावसाळयापूर्वी काम पुर्णत्वास जाणे गरजेचे असल्याने त्यादृष्टीने कामाचा वेग वाढवण्यात आला आहे.

पावसाळयापूर्वी काम पुर्ण करा

खारभूमी विकास योजनेच्या दुरूस्तीअभावी पावसाळयात पाणी तुंबून शेती पाण्याखाली जाते. यातून शेतकऱ्यांना मोठया नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी भिलेतील या योजनेचे काम पावसाळयापूर्वी कोणत्याही परिस्थितीत पुर्ण झाले पाहीजे. याबाबतच्या सुचना दिल्या गेल्या आहेत.

-शेखर निकम, आमदार