
दोडामार्ग : शिक्षणाचे वारे आता खऱ्या अर्थाने खेड्यापाड्यांत पोहोचले आहे. स्वातंत्र्य दिनी झोळंबे येथील जिल्हा परिषद शाळेने डिजिटल युगात एक क्रांतीकारी पाऊल टाकत, तब्बल १.५० लाख रुपये खर्चून बसवलेल्या अत्याधुनिक डिजिटल स्मार्ट बोर्डचे उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. विशेष म्हणजे, न्यूझीलंड येथे स्थायिक झालेल्या गावाच्या कन्या आणि याच शाळेची माजी विद्यार्थिनी दिपाली शंकराव गवस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या भरघोस देणगीतून हा महत्त्वपूर्ण प्रकल्प साकार झाला आहे. हा स्मार्ट बोर्ड बसवणारी झोळंबे शाळा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच जिल्हा परिषद शाळा ठरल्याने तिचे विशेष कौतुक होत आहे.
या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दिपाली गवस हीचे वडील आणि भारतीय सेनेचे निवृत्त मेजर शंकरराव गवस उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या इंटरॅक्टिव्ह डिजिटल स्मार्ट बोर्डचे अनावरण करण्यात आले. यावेळी, आपल्या मनोगतात शंकरराव गवस यांनी पालकांना, विशेषतः मुलांच्या शिक्षणाबाबत अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले. त्यांनी आर्थिक साक्षरतेचे महत्त्व विशद केले आणि आपल्या मुलीने परदेशात राहूनही स्वखुशीने गावासाठी केलेल्या या योगदानाचा अभिमान व्यक्त केला. "शिक्षण हेच विकासाचे खरे साधन आहे," असे सांगत त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक प्रविण देसाई यांनी प्रास्ताविक मांडून या प्रकल्पाची माहिती दिली. त्यानंतर, दिनेश जाधव यांनी स्मार्ट बोर्डवर एक आकर्षक सादरीकरण करून त्याची उपयुक्तता व आधुनिकता उपस्थितांना दाखवली. यामुळे शिक्षणाचे स्वरूप किती मनोरंजक आणि प्रभावी होऊ शकते, याचा अनुभव सर्वांना आला.
यावेळी बोलताना सरपंच विशाखा नाईक यांनी शाळेने विविध उपक्रमांत मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षकांच्या कामगिरीची प्रशंसा केली. त्यांनी शाळेच्या पुढील प्रगतीसाठी नेहमीच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच, "विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे आणि उज्ज्वल भविष्य घडवावे," असे उद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमादरम्यान, कोलझर केंद्रप्रमुख अंजली जोशी यांनीही आपले विचार व्यक्त केले. त्यांनी प्रशासनाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आणि शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांचा शुभेच्छा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला. यासोबतच, जोशी यांनी शैक्षणिक प्रगतीसाठी व सामाजिक योगदानासाठी झटणाऱ्या सर्व माजी विद्यार्थी व ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमात देणगीदार दिपाली गवस यांनी व्हिडिओद्वारे संवाद साधत स्वातंत्र्य दिनाच्या तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. परदेशात असूनही आपल्या गावाबद्दल आणि शाळेबद्दल असलेले त्यांचे प्रेम पाहून उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष गवस यांनी केले, तर विशाल माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गावाच्या सरपंच विशाखा नाईक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुखाजी गवस, माजी सरपंच राजेश गवस, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक गवस आणि उपाध्यक्षा दिक्षा घोगळे यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. प्रकाश गवस, सुधीर गवस, सुभाष गवस,, संजना गवस, प्रभावती गवस, आणि विनीता गवस व देवेंद्र भैरवकर यांच्यासह प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष शोभा आली.
या स्मार्ट बोर्डमुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची भूक वाढेल आणि शिक्षणाचे धडे अधिक सोप्या व आधुनिक पद्धतीने गिरवले जातील, अशी आशा या निमित्ताने व्यक्त करण्यात आली. खऱ्या अर्थाने, झोळंबे गावात आता डिजिटल शिक्षणाचे नवे पर्व सुरू झाले आहे.