जिल्हा परिषदचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 04, 2023 22:10 PM
views 316  views

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ आज जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांसाठी १९ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यामधून ८ शिक्षकांची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे. याबाबतची माहिती आज प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी दिली.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सन २०२३ साठी जिल्ह्यातून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. या पुरस्कारांसाठी १९ शिक्षकांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. यात कुडाळ ५ मालवण ४, देवगड, कणकवली, वैभववाडी वेंगुर्ला प्रत्येकी २, दोडामार्ग, सावंतवाडी प्रत्येकी १ असे प्रस्ताव प्राप्त झाले होते. यातून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने ८ शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ साठी निवड केली आहे. या पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे आज मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी जाहीर केली. 

आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ प्राप्त शिक्षकांमध्ये देवगड - दीपक तानाजी डवर, उपशिक्षक (सौंदाळे बाऊलवडी), दोडामार्ग - संतोष ज्ञानेश्वर गवस, उपशिक्षक (झोळंबे), कणकवली - विद्याधर पांडुरंग पाटील, उपशिक्षक (घोणसरी नं ५), कुडाळ - पंढरीनाथ अनंत तेंडोलकर, पदवीधर शिक्षक (अणाव दाभाचीवाडी), मालवण - दिपक केशव गोसावी, उपशिक्षक (धामापूर बौध्दवाडी), सावंतवाडी - अरविंद नारायण सरनोबत, उपशिक्षक (माडखोल नं २), वैभववाडी - संतोष यशवंत मोहिते, उपशिक्षक (बालभवन विद्यामंदिर मौदे) तर वेंगुर्ला - शामल शंकर मांजरेकर/पिळणकर, उपशिक्षिका (केंद्र शाळा वायंगणी सुरंगपाणी) या शिक्षकांचा समावेश आहे.