
कुडाळ : झाराप ग्रामपंचायतीने दिव्यांग बांधवांसाठी संवेदनशील पाऊल उचलत गरजू लाभार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. दिव्यांग निधीतून सहदेव गोविंद बिडये यांना व्हीलचेअरचे वितरण करण्यात आले असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या हस्ते सहदेव बिडये यांना व्हीलचेअर प्रदान करण्यात आली. यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळणार असून स्वावलंबनाकडे टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
यावेळी उपसरपंच मंगेश गावकर, ग्रामपंचायत सदस्य तनया मांजरेकर, संजीवनी पेंडूरकर, अमृता हरमलकर, विशाखा गोडे, ग्रामसेवक गंगाराम वेंगुर्लेकर, तलाठी सुषमा गायकवाड, आरोग्य सेवक आकाश तायंडे, आरोग्य सेविका सुमन पालव, सीएचओ अंकिता गावकर, आशा कार्यकर्ती सारिका वारंग यांच्यासह सदाशिव आळवे, प्रकाश सावंत, गोविंद बिडये व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की, दिव्यांग बांधवांना सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी ग्रामपंचायतीकडून अशा योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे.
झाराप ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून “गरजूंना वेळेवर मदत” हा संदेश पुन्हा एकदा कृतीतून अधोरेखित झाला आहे.











