
सावंतवाडी : युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांच्यावर टीका केली आहे. जनतेने नाकारलेल्या व्यक्तींचे समर्थन करण्यापेक्षा, माजी नगराध्यक्ष आणि सध्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केलेल्या कार्याचा अभ्यास करूनच वक्तव्य करावे, असा सल्ला युवासेनेने दिला आहे.
यावेळी युवासेना शहराध्यक्ष निखिल सावंत, युवासेना विधानसभा अध्यक्ष अर्चित पोकळे, युवा सैनिक क्लेटस फर्नांडिस, राजू कुबल आदी उपस्थित होते. युवासैनिक म्हणाले, नगराध्यक्ष असताना संजू परब यांनी कंत्राटी सफाई कामगारांच्या अडचणी नेहमीच समजून घेतल्या आहेत. त्यांच्याच पुढाकाराने वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून कर्मचाऱ्यांचे पगार वितरित झाले. ही वस्तुस्थिती असताना, केवळ ३०० मते मिळालेल्या बबन साळगावकरांची बाजू घेऊन रवी जाधव यांनी बालिश वक्तव्य केले, असे युवा सैनिकांनी म्हटले आहे. युवासेनेने रवी जाधव यांच्या सामाजिक कार्याचा आदर करत, त्यांना राजकारणावर भाष्य करताना अभ्यासपूर्ण भूमिका घेण्याची विनंती केली आहे.
"तुमच्या कार्याचा आम्ही आदर करतो, पण आमच्या नेत्याचा आदर तुम्हीही करावा," अशी प्रामाणिक भावना त्यांनी व्यक्त केली आहे. कुणाचे तरी ऐकून किंवा राजकीय व्यक्तिमत्त्वांचा सखोल अभ्यास न करता राजकारणावर भाष्य करणे रवी जाधव यांनी टाळावे, असे आवाहन युवा सैनिकांनी केले आहे. संजू परब यांनी नगराध्यक्ष पदाच्या अल्पावधीत केलेली कामे प्रेरणादायी आहेत. त्यामुळे रवी जाधव यांनी नगरपरिषदेत जाऊन त्यांच्या कामाचा आढावा घ्यावा आणि मगच आपली मते मांडावीत. राजकीय वळण देऊन स्वतः भरकटू नये, तसेच केविलवाणे वक्तव्य करणे टाळावे, असा टोलाही युवा सैनिकांनी लगावला आहे.