दीपक केसरकर ठरले अपयशी, द्यावा मंत्रीपदाचा राजीनामा : रूची राऊत

शिक्षणमंत्र्यांविरूद्ध युवासेनेची "बोंबाबोंब" !
Edited by: विनायक गावस
Published on: September 05, 2023 15:41 PM
views 791  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये अजूनपर्यंत शिक्षक न दिल्याने शिक्षण विभागाची,विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तसेच स्थानिक डीएडच्या बेरोजगारांची प्रचंड कुचंबणा होत आहे. युवक बेरोजगार असून त्याकडे दुर्लक्ष केल्यानं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विरुद्ध  शिक्षकदिनी युवासेनेच्यावतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. मंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर युवासेना बोंबाबोंब आंदोलन छेडले होत. परंतू, पोलिसांनी या युवासेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना रोखून धरत घरापर्यंत पोहचू न देता ताब्यात घेतल. यावेळी पोलिसांच्या विरोधात युवासैनिकांनी नाराजी व्यक्त करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे शिक्षण विभागाचे मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. त्यांनी आपल्या पदाचा स्वतःहून राजीनामा द्यावा असा टोला खासदार कन्या, युवती सेनेच्या रूची राऊत यांनी लगावला. 

युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट व युवती सेनेच्या रूची राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. गवळी तिठा येथून या आंदोलनाला सुरुवात झाली. मंत्री केसरकर यांच्या घरासमोर हे आंदोलन होणार होत. परंतु, पोलिसांकडून युवासैनिकांना रोखण्यात आलं. त्यांना ताब्यात घेतले गेलं. यावेळी दीपक केसरकर यांच्या विरोधात भडकलेल्या युवासैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

यावेळी युवा सेना नेते सागर नाणोसकर म्हणाले, युवकांचे प्रश्न अधांतरी आहेत. डीएड धारक बेरोजगार असून त्यांचा प्रश्न वारंवार समोर येत आहे. मात्र, जिल्ह्यातील सुपुत्र असणारे शिक्षणमंत्री दीपक केसरकर याकडे लक्ष देत नाही आहेत. त्याकडे कानाडोळा करत असल्यानं आज हे बोंबाबोंब आंदोलन युवा सेनेचे मंदार शिरसाट, युवती सेनेच्या रूची राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडले आहे. दीपक केसरकर यांनी स्वताहून राजीनामा दिला पाहिजे. जिल्ह्यातील प्रश्न न सोडवणारे महाराष्ट्राला काय न्याय देणार ? इथल्या स्थानिक युवकांबद्दल ते कधी बोलताना दिसत नाही त्यामुळे नाईलाजास्तव आंदोलन करावं लागतं आहे. सर्वत्र दडपशाहीच सुरु आहे. आजही पोलीस बळाचा वापर करून युवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. हे शासन सामान्यांच, शेतकरी युवकांच नसून धनदांडग्याच आहे. या सरकारचा आम्ही निषेध करतो असं मत त्यांनी व्यक्त केल.तर लोकशाही राज्यात कशी दडपशाही केली जाते हे आज दिसून आलं. एकीकडे युवकांना बेरोजगार ठेवत निवृत्त झालेल्यांना पुन्हा सेवेत घेणारे शिक्षणमंत्री यांना निर्बुद्धमंत्री म्हणाव लागेल असा हल्लाबोल सौ.काजल सावंत यांनी केला. 

दरम्यान, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून युवकांना असलेल्या अपेक्षांचा भंग झाला आहे. ते कधी येतात कधी जातात ? हे कुणाला समजतही नाही. कोल्हापूर, मुंबईत बसण्यापेक्षा इथल्या जिल्ह्यातील शिक्षक व युवकांसाठी काहीतरी त्यांनी करावं. अन्यथा मंत्री असून तुमचा फायदा काय ? असा सवाल युवती सेनेच्या रूची राऊत यांनी करत केसरकरांवर जोरदार हल्लाबोल केला. तर शिक्षणमंत्री दीपक केसरकर अपयशी ठरले असून शिक्षकांचे, युवकांचे प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

पोलिसांनी रोखून धरल्यान थेट रस्त्यावर बसत राज्य सरकारचा निषेध युवासैनिकांनी व्यक्त केला. यावेळी मंदार शिरसाट, रूची राऊतं, सागर नाणोसकर, योगेश धुरी, मायकल डिसोझा, गुणाजी गावडे, काजल सावंत, अनुराग सावंत, योगेश नाईक, बाळा गावडे, आबा सावंत आदींसह युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बोंबाबोंब आंदोलनात सहभागी झाले होते.