युवकांनी स्वतःची मतदार नोंदणी करून घ्यावी

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचं आवाहन
Edited by:
Published on: January 25, 2025 19:09 PM
views 186  views

मालवण : देशाचे भवितव्य हे आजच्या युवा पिढीच्या हाती आहे. यादृष्टीने युवकांनी स्वतःची मतदार नोंदणी करून घेणे हे पहिले पाऊल आहे. वयाची १८ वर्ष पूर्ण केलेल्या ज्या युवक व युवतीनी मतदार नोंदणी केलेली नाही त्यांनी नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाचे आवश्यक ते सहकार्य असून ऑनलाइन पद्धतीने देखील मतदार नोंदणी करता येते. मतदार नोंदणी करून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा अधिकार बजावणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांनी येथे बोलताना केले.

जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अनिल पाटील हे बोलत होते. प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते संतोष लुडबे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, कुडाळ मालवणच्या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे, सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर आदी उपस्थित होते. 

यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील व सामाजिक कार्यकर्ते संतोष लुडबे यांचा सत्कार करण्यात आला. तर मातृत्व आधार फाउंडेशनतर्फे जिल्हाधिकारी श्री. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रशासनाकडून मालवण तालुक्यातील विविध महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंद करणारा भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी रांगोळीकर पार्थ मेस्त्री याचा सत्कार करण्यात आला. तर वायरी येथील लाकडापासून वाहनांच्या प्रतिकृती बनविणारा गीतेश मेस्त्री याने आपल्या वस्तूंचे सादरीकरण जिल्हाधिकारी यांच्या समोर केले.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी मतदार नोंदणी बाबत मार्गदर्शन करत  मतदार नोंदणी करून घेणे आवश्यक असून मतदार नोंदणी विषयक विविध अर्जांची माहिती घ्यावी. युवक सक्षम झाल्यास लोकशाही सक्षम होईल, असे सांगितले. तर तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी विचार मांडत मतदानाच्या अधिकाराचे महत्व काय असते हे आजपर्यंत देशातील लोकांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोगाने ग्राम स्तरावरही मतदार नोंदणीच्या सुविधा उपलब्ध केल्या असून त्याद्वारे मतदार नोंदणी करण्यात यावी असे सांगितले. यावेळी संतोष लुडबे यांनी या कार्यक्रमासं शुभेच्छांचा देताना पूर्वीपेक्षा आज मतदाना विषयी लोकांमध्ये चांगली जागृती होत आहे, असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यानी जीवन खडतर असले तरी परिस्थितीचे प्रदर्शन न करता आत्मविश्वास कायम ठेवून आपले काम करत राहावे असेही श्री. लुडबे म्हणाले. शेवटी आभार नायब तहसीलदार प्रिया शेवाळे यांनी मानले. 

यावेळी निवडणूक नायब तहसीलदार नागेश शिंदे, नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले, सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. देविदास हारगिले, मातृत्व आधार फाउंडेशनचे सचिव दादा वेंगुर्लेकर यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग, महसूल व निवडणूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी व प्राध्यापक आदी उपस्थित होते.