शिकार बेतली जीवावर ; शिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 21, 2023 12:25 PM
views 252  views

कणकवली : शिकारीसाठी गेलेल्या नितीन सुभाष चव्हाण ( 38, रा. खारेपाटण-गुरववाडी) याला बंदुकीची गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास शेजवली जंगलात घडली.

नितीन चव्हाण याला शिकारीचा छंद होता. मंगळवारी रात्रीच्या सुमारास तो राजापूर तालुक्यातील पन्हाळे - शेजवली या गावाकडील जंगल भागात मोटरसायकलने शिकारीसाठी गेला होता. नळी असलेली बार भरलेली बंदूक छातीकडील पुढील भगात खोउन ठेवली होती. मात्र अचानक बंदुकीचा चाप घाई गडबडीत चुकीचा ओढला गेल्यामुळे किंवा गाडी वरून पडल्यामुळे चाप दाबला गेल्यामुळे बंदुकीची गोळी नितीन याच्या छातीला लागून यामध्ये तो गंभीर जखमी झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. जखमी अवस्थेत असलेल्या नितीनने आपला मोठा भाऊ बाळू चव्हाण याला फोन करून आपल्याला गोळी लागल्याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच नितीन चव्हाण यांचे नातेवाईक जंगलाच्या दिशेने जात त्याला शोधून काढले. जखमी अवस्थेतच त्याला खासगी वाहनाने उपचारासाठी कणकवली येथे नेत असतानाच नितीन चव्हाण याचा वाटेतच मृत्यू झाला. त्याचा पश्चात आई पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.