
वैभववाडी : सामाजिक सुधारणेत युवकांचा सहभाग महत्त्वाचा असतो.सक्षम व जबाबदार समाज उभारण्यासाठी युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे असे आवाहन वैभववाडी नगरपंचायतीचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रतिक थोरात यांनी केले. वाभवे-वैभववाडी नगरपंचायत व आनंदीबाई रावराणे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने "सेवा हक्क दिनकृती" कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी श्री थोरात बोलत होते. या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता मोहिमा, नागरी सेवा जनजागृती अभियान आणि नागरिक व प्रशासन यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी विविध उपक्रम, पुरविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती श्री.थोरात यांनी दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. व्हि. गवळी व NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. व्हि. ए. पैठणे, प्रा. एस. आर. राजे, प्रा.एस.एम.करपे यांनी नगरपंचायतीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी सदस्यांनी सामाजिक उन्नती आणि सक्रिय नागरी सहभागासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली.