
देवगड : मासे पकडण्यासाठी गेलेल्या बापर्डे सडेवाडी येथील सखाराम वाघू झोरे(४५) यांचा मृतदेह बुधवारी सायंकाळी ४.३० वा.सुमारास तळेबाजार तलावामध्ये आढळला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, बुधवारी सायंकाळी ४.३० वा.सुमारास तळेबाजार येथील तलावात एका व्यक्तिचा मृतदेह पाण्यात तरंगत असताना तेथिल संजय रूमडे या ग्रामस्थांना दिसला. त्यांनी याबाबत पोलिस पाटील मुकेश पारकर यांना कळविले.पारकर यांनी देवगड पोलिस स्टेशनला कल्पना दिल्यानंतर पोलिस हवालदार राजन जाधव, महेंद्र महाडिक, अमित हळदणकर यांनी घटनास्थळी जावून पोलिस पाटील, स्थानिक ग्रामस्थ रोहीत गावकर यांच्या सहकार्याने मृतदेह तलावातून बाहेर काढला. यावेळी तळवडे कॉलेज येथे प्राध्यापक असलेल्या प्रा.झोरे यांना बोलावून घेतल्यानंतर त्यांनी पाहणी करून हा मृतदेह सखाराम झोरे याचा असल्याचे सांगितले. यामुळे मृतदेहाची ओळख पटली.
सखाराम झोरे हे मोलमजूरी करून उदरनिर्वाह करीत होते. बापर्डे येथे आई वडीलांसमावेत राहत होते त्यांच्या पत्नीचे निधन झाले असून त्यांना दारूचे व्यसन होते. त्यांची मुले शिक्षणानिमित्त बाहेरगावी असून तळेबाजार येथे ते तलावाकडे मासेमारी करण्यासाठी आले असल्याचा प्राथतिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देवगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून तपास पोलिस हवालदार महेंद्र महाडिक करीत आहेत.