
पेडणे : पेडणे तालुक्यातील धारगळ येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात नेरुल येथील २० वर्षांच्या तरुणाचा एसटीखाली चिरडून जीव गेला. सुदीप पैकर असं या तरुणाचं नाव आहे.
हा तरुण ३० जुलै रोजी दुपारी दुचाकीने धारगळहून पर्वरीच्या दिशेने येत होतो. दोन खांब इथं कोल्हापूरहून पणजीच्या दिशेनं निघालेल्या हिरकणी एसटीनं त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेने तो उसळून रस्त्यावर आपटला आणि त्याच एसटीच्या चाकाखाली चिरडला. या अपघातामुळं महामार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेनंतर स्थानिकांनी पोलिसांना पाचारण केले. काही वेळातच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली. तसंच घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवून दिला. दरम्यान, हा तरुणं दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलत होता, असा दावा उपस्थितांनी केलाय. याप्रकरणी पोलिसांनी एसटी चालकाची चौकशी सुरू केली असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.