आपला दवाखाना, आपल्या सेवेत | मोफत औषध, तपासणीसह उपचार

Edited by: विनायक गावस
Published on: August 08, 2023 20:47 PM
views 246  views



*सावंतवाडी :* सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनामार्फत हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' ही योजना शिंदे-फडणवीस सरकारने राज्यभरात सुरू केली आहे. सावंतवाडी शहरात त्यातील एका  दवाखान्याचा शुभारंभ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सावंतवाडीत आले असताना त्यांच्या हस्ते झाला होता. शालेय शिक्षणमंत्री स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे हा दवाखाना रूग्णसेवेत नव्हता. गेल्या आठवड्यापासून हा दखावाना रूग्णसेवेत उतरला आहे. मोफत तपासणी, मोफत उपचार व मोफत औषध या ठिकाणी मिळत असून शहरातील अनेकांना याचा फायदा होत आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्ष साळगावकर यांसह अधिपरीचारीका तृप्ती अंधारी, मदतनीस अक्षता सुतार, परब हे रूग्णसेवा देत आहेत.


शहरातील गोरगरीब लोकांना संपूर्ण दिवस काढून सरकारी रूग्णालयात जावं लागतं होत. त्यांच्यासाठी संध्याकाळच्या वेळेत हा 'आपला दवाखाना' रूग्णसेवा देणार आहे. दुपारी २ ते रात्री ९ या वेळेत हा दवाखाना आरोग्य सेवा देत आहे. प्राथमिक उपचार याठिकाणी केले जात आहेत. तर अधिक उपचारासाठी रूग्ण उपजिल्हा रुग्णालयात पाठवला जात आहे. तसेच लॅब देखील या दवाखान्यात सुरु होणार आहे. डायबिटीस, कोलेस्टेरॉल पासून सर्व चाचण्या या मोफत केल्या जाणार आहेत. या दवाखान्यात कोणताही शुल्क आकारला जाणार नाही अशी माहिती डॉ. हर्ष साळगावकर यांनी दिली आहे.


नगरपरिषद सावंतवाडीच्या दवाखान्याच्या जोडीला आता "आपला दवाखाना'' मदतीला आला आहे. त्यामुळे आता शहरात २४ तास उपचार मिळणार आहेत. तर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची होत असलेली प्रचंड गर्दी लक्षात घेता ताप, सर्दी अशा आजारांसाठी तसेच मोफत उपचार आणि वैद्यकीय चाचणीसाठी हा दवाखाना 'आपला' ठरणार आहे.