
सावंतवाडी : निरोगी जीवन जगायचे असेल तर डॉक्टरांच्या मागे न लागता योगाची साधना करा, निरोगी आयुष्यासाठी योग ही एकमेव गुरूकिल्ली आहे. ऑर्बिट योगाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात योगाभ्यास करणाऱ्यांनी अनेक आजारांवर मात केली आहे. त्यामुळे सर्वांनीच योगाकडे वळणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन सकल हिंदू सामाजाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले. ऑर्बिट योगा स्टुडिओच्या द्वितीय वर्धापनदिनाच्या व जागतिक योग दिनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे,डॉ. गिरीश चौगुले ,डॉ. अमृता स्वार, डॉ. गणपत्ये,निवृत्त शिक्षक भरत गावडे, पतंजलीचे महेश भाट, वेध शाळेचे प्राध्यापक कशाळीकर, संदीप कुडतरकर ऑर्बिट योगा स्टुडिओचे संचालक अमोल सोनवणे, विनेश तावडे आदी उपस्थित होते
यावेळी श्री. गावडे म्हणाले, योगाला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवाधिदेव शंकर यांनी अफाट शक्ती ही योग व ध्यानधारणेमुळे प्राप्त केली. त्यांचे तांडव नृत्य हे योग साधनेचा एक भाग आहे. शरीरातील सर्व अवयव सुदृढपणे कार्यान्वित राहायचे असतील तर गोळ्यांपेक्षा योगा त्यावर प्रभावी औषध आहे.या योगाची कास धरल्यावर निरोगी जीवनशैली आपल्याला जगता येईल त्यासाठी तंत्रशुद्ध योगाची गरज आहे. तो योगा ऑर्बिट योगा स्टुडिओमध्ये शिकवला जातो. त्याचा प्रत्येकाने लाभ घेणे गरजेचे आहे असे आवाहन केले.
तर निवृत्त शिक्षक भरत गावडे यांनी योगामुळे जीवनशैली उत्साही बनते, उत्साह वाढतो ,सकारात्मक ऊर्जा तयार होते व शरीर निरोगी राहते. त्यामुळे प्रत्येकाने योगा करणे गरजेचे आहे असे स्पष्ट केले. तर योगप्रशिक्षक अमोल सोनवणे यांनी गेल्या दोन वर्षातील योगा स्टुडिओची कामगिरी विषद करून योगामुळे अनेक जणांना अनेक आजारांवर मात करता आली असे स्पष्ट केले. यावेळी योगा शिकण्यासाठी येणाऱ्या योग प्रशिक्षणार्थ्यांनी योग कला सादर केल्या. त्यातून तीन ग्रृपना नंबर देण्यात आले. तर दोन ग्रृपला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले व इतर ग्रृपला गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले तर आभार प्रशिक्षक अमोल सोनवणे यांनी माणले.