
कुडाळ : आजच्या काळात जिथे एकत्र कुटुंब पद्धती दुर्मिळ होत चालली आहे, तिथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात असलेल्या नेरूळ-वाघचौडी येथील गावडे कुटुंबाने एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. तब्बल ५२ कुटुंबांचा समावेश असलेल्या या मोठ्या कुटुंबाच्या गणपती उत्सवाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये (World Book of Records) करण्यात आली आहे.
जवळपास ६०० वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा गावडे कुटुंबाची पुढची पिढी आजही त्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपत आहे. या कुटुंबाची १०० पेक्षा अधिक घरे असली तरी, गणेशोत्सव काळात सर्व सदस्य एकत्र येतात आणि एकाच गणपतीची मनोभावे पूजा करतात. ११ दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये सर्व कुटुंबीय बाप्पाची सेवा करतात. या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ५२ चुलींवर तयार केलेला नैवेद्य ५२ पानांवर बाप्पाला अर्पण केला जातो.
या सोहळ्यामध्ये २०० पेक्षा जास्त महिला एकत्र येऊन हसत-खेळत नैवेद्य बनवतात आणि हा उत्सव आनंदात साजरा करतात. त्यांच्या या अनोख्या एकोप्यामुळे आणि शतकानुशतके चाललेल्या परंपरेमुळेच यावर्षी त्यांच्या बाप्पाची नोंद 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये झाली आहे. या विक्रमी नोंदीमुळे संपूर्ण गावडे कुटुंबाला खूप अभिमान वाटत आहे.










