
कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांचे एआय प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. एआयचा दैनंदिन शैक्षणिक प्रक्रियेत वापर वाढावा यासाठी पालकमंत्री आग्रही आहेत. याचाच एक भाग म्हणून युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने शिक्षकांसाठी एआयच्या मदतीने स्पर्धा परीक्षांकरिता प्रश्ननिर्मिती कार्यशाळेचे आयोजन गुरुवार २५ सप्टेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कणकवली पंचायत समितीच्या भालचंद्र महाराज सभागृहात करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत एआयच्या साह्याने इयत्ता १ ली ते ७ वी मधील स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक प्रश्नावली तयार करण्यात येणार आहे. ही प्रश्नावली सर्व शाळांसाठी पीडीएफ स्वरुप मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कार्यशाळेत जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी या उद्देशाने युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी ज्ञान रचनावाद व डिजिटल शाळा या विषयावर युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने यशस्वी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्वांनी या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत, माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सुशांत मर्गज, प्रमोद पवार यांना संपर्क साधावा.